Jump to content

अतिनाट्य (मेलोड्रामा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकोणिसाव्या शतकात गाणी असलेल्या नाटकांना मेलोड्रामा म्हणत असत, हळूहळू त्याच्यातील संगीत बाजूला पडले आणि आश्चर्यचकित करणारे प्रसंग व थरारक किंवा रोमांचक शेवट असणाऱ्या सर्वच नाटकांना मेलोड्रामा किंवा अतिनाट्य म्हणले जाते. नेपथ्य, रंगमंच सजावट, पात्रांचे पोषाख, पात्रांचा शैलीदार अभिनय तसेच अत्यंत आदर्श किंवा अत्यंत वाईट अशी ठोकळेबाज पात्रे, लक्षवेधी घटना, नाट्यपूर्ण प्रसंग, क्रौर्य, दुःख आणि विनोद यांची सरमिसळ, सत्प्रवृत्त पात्रांचा दुष्ट स्वभावाच्या पात्रांनी केलेला छळ ही अतिनाट्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. नाटकांत नायक सर्व पातळ्यांवर पराभूत होऊन खलनायकाचा विजय होणार असे वाटत असतानाच घटना प्रसंगांना कलाटणी मिळते आणि शेवटी नायक विजयी होतो. याकरिता अतिनाट्यांमध्ये योगायोग आणि पात्रांचे स्वभाव परिवर्तन ही सामग्री वापरली जाते. पल्लेदार संवाद, चेहऱ्याच्या हालचाली आणि संवादातून साधणारा उत्कट भावभिनय, थरारक पार्श्वसंगीत व प्रकाशयोजना ही अतिनाट्याच्या सादरीकरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये होत. मराठीत राम गणेश गडकरी लिखित भावबंधन, बाळ कोल्हटकर लिखित वाहतो ही दूर्वांची जुडी, वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले, इ. काही गाजलेली अतिनाट्ये आहेत.[ संदर्भ हवा ]