Jump to content

सापेक्ष आर्द्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सापेक्ष आर्द्रता (इंग्लिश: relative humidity, रिलेटिव्ह ह्यूमिडिटी ;) म्हणजे हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण(आर्द्रता) मोजण्याचे परिमाण होय. हवेच्या बाष्प धारणक्षमतेला मर्यादा असते. त्या मर्यादेपेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक झाले तर जास्तीच्या बाष्पाचे द्रवीकरण (इंग्लिश: condensation, 'कंडेन्सेशन ;) होऊन पाणी बनते.

सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे तापमापक

आर्द्रता मोजण्याच्या पद्धती

[संपादन]
  • सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी एका पद्धतीनुसार दोन तापमापके वापरतात. त्यापैकी एका तापमापकाच्या पारा ठेवलेल्या फुग्याला मलमलीचे पातळ कापड गुंडाळलेले असते. आणि ते ओले राहण्याची व्यवस्था केलेली असते. या ओलसर कापडातून पाण्याचे बाष्पीभवन होत असते. त्यामुळे या तापमापकावर तापमान काहीसे कमी दाखवले जाते. याला 'वेट बल्ब तापमान' म्हणतात. दुसऱ्या कोरड्या तापमापकावर दाखवल्या जाणाया तापमानाला 'ड्राय बल्ब तापमान' म्हणतात. जर हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर अधिक पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि ओल्या तापमापकाचा फुगा जास्त थंड होऊन दोन्हीतल्या तापमानातला फरक जास्त राहील. आर्द्रता खूप जास्त असेल तर पाण्याचे बाष्पीभवन अगदी कमी होऊन हा शीतनाचा परिणाम मिळणार नाही आणि दोन्ही तापमापकातील तापमान जवळजवळ सारखेच दिसेल. सापेक्ष आर्द्रता १०० टक्के असेल तर बाष्पीभवन शून्य होऊन दोन्ही तापमापके समान तापमान दर्शवतील.
  • सापेक्ष आर्द्रता मोजण्याच्या दुसऱ्या पद्धतीत मानवी केसाचा उपयोग केला जातो. आर्द्रता वाढली की केसाची लांबी वाढते. तेलाचा अंशही नसलेल्या मानवी केसांच्या एका जुडीला, शून्यापासून शंभर असे आकडे असलेल्या तबकडीवर फिरणारा एक काटा जोडतात. केस पूर्ण ओले केले की तो काटा तबकडीवरील शंभर या आकड्याला स्पर्श करतो. हवेतील आर्द्रता कमी व्हायला लागली की केसांचा पुंजका कोरडा होऊ लागतो आणि काटा तबकडीवर कमी सापेक्ष आर्द्रता दाखवतो.
  • तिसऱ्या पद्धतीत हायग्रिस्टरचा वापर करतात. सापेक्ष आर्द्रता वाढली की हायग्रिस्टरचा विद्युत विरोध कमी होतो. हायग्रिस्टरमधून पसार होणाऱ्या विद्युत प्रवाहाचा दाब मोजून सापेक्ष आर्द्रतेचे अनुमान करता येते.

परिणाम

[संपादन]

मनुष्यप्राण्याच्या शरीरात सतत उष्णता निर्माण होत असते. त्यातील थोडीशी ऊर्जा हालचाल, श्वासोच्छ्वास, अन्नपचनमेंदूच्या आणि इतर शारीरिक क्रियांसाठी वापरली जाते. बाकीची ऊर्जा त्वचेतून बाहेर टाकली जाते. ऊर्जेचे हे संक्रमण सुलभ होण्यासाठी घामाच्या बाष्पीभवनाचा उपयोग होतो. अधिक सापेक्ष आर्द्रता असलेल्या जागी (उदा. किनारपट्टीचे प्रदेश) किंवा अशा काळात (उदा पावसाळ्यापूर्वीचा काळ) घामाचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणारी उष्णता बाहेर टाकली जाणे अवघड जाते. त्यामुळे मनुष्यास अस्वस्थ वाटते. उलट कमी सापेक्ष आर्द्रता असलेला प्रदेश किंवा काळ मनुष्यास सुखकर वाटतो. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत हे आपण अनुभवतोच. सापेक्ष आर्द्रता जास्त असेल तर सुती कापडाच्या गिरणीत धागे तुटण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून अशा गिरण्यांमध्ये मुद्दाम सापेक्ष आर्द्रता वाढविली जाते. जास्त सापेक्ष आर्द्रता असलेल्या ठिकाणी विविध जीव-जंतूंची वाढ अधिक होते. त्यामुळे लाकडी वस्तूंवर बुरशी येणे वगैरे अधिक प्रमाणात आढळते.

अधिक वाचन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]