बेकारी
बेकार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही असा व्यक्ती होय, बेकारीचा अभ्यास करताना दोन बाबी आधी स्पष्ट झाल्या पाहिजेत, पहिली म्हणजे बेकारीची व्याख्या कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादीत ठेवावी लागते, लोकसंख्येतील ० ते १४ वयोगट व ज्येष्ठ नागरिक इ. घटक वजा केल्यावर जी उरते ती कार्यकारी लोकसंख्या होय.
बेकारी म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.
भारतात १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला आहे.[१] तरीही बेकारीची समस्या वाढते आहे. [२]
बेकारीची संकल्पना
[संपादन]१. अनैच्छिक बेकारी
[संपादन]या बेकारीला दृश्य किंवा उघड बेकारी असेही म्हणतात. ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात, परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही. ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातून निर्माण होते. यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विनामोबदला किंवा कमी मोबदला; त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्छाटन होत असलेले दिसून येते. तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
२. ऐच्छिक बेकारी
[संपादन]हा बेकारीचा असा प्रकार आहे की जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने ही बेकारीची स्थिती नसून निष्क्रियतेची स्थिती आहे.
३. न्यून किंवा अर्धबेकारी
[संपादन]ही एक अशी स्थिती होय , की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही, किंवा तिला कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. उदा. १. पदव्युत्तर शिक्षित व्यक्तीने पहारेकऱ्याची नोकरी करणे २. इंजिनिअर व्यक्तीने शिपायाची नोकरी करणे.
४. पूर्ण बेरोजगारी
[संपादन]व्यक्तीकडे पात्रता, कौशल्य, इच्छाशक्ती, असूनही कोणत्याच ठिकाणी काम प्राप्त होत नाही. याला पूर्ण बेरोजगारी म्हणतात
बेकारीचे प्रकार
[संपादन]१. ग्रामीण बेकारी
[संपादन]ही बेकारी प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून येते. ही एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे. यामध्ये खालील प्रकार येतात.
अ) हंगामी बेकारी
[संपादन]भारतात बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते.यामुळे ग्रामीण शेतमजुरांना केवळ ४ ते ५ महिनेच काम प्राप्त होते व उर्वरित काळ ते बेकार राहतात म्हणून या प्रकाराला हंगामी बेकारी म्हणतात. ही बेकारी शहरी भागात सुद्धा आढळते. उदा. पर्यटन क्षेत्रातील मार्गदर्शक, लग्नसमारंभातील वादक इत्यादी.
ब) प्रच्छन्न बेकारी (छुपी)
[संपादन]अति लोकसंख्येच्या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्रच्छन्न बेकारी ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या आहे. या प्रकारच्या बेकारीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची सीमान्त उत्पादकता शून्य राहते, म्हणजेच अतिरिक्त लोक उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही व छुपी बेकारी निर्माण होते. उदा. एका कारखान्यात उत्पादन प्रकियेसाठी केवळ २० कामगारांची गरज असताना तेथे २५ कामगारांनी काम करणे. येथे अतिरिक्त ५ कामगार हे छुपे बेकार ठरतील व ते उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही.अशा अतिरिक्त कामगारांनी उत्पन्नाचे मूल्य विनाकारण वाढते.
२. शहरी बेकारी
[संपादन]जी बेकारी शहरी भागांमध्ये आढळून येते तिला शहरी बेकारी म्हणतात. याचे खालील प्रकार आहेत.
अ) सुशिक्षित बेकारी
[संपादन]'ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी, बारावी पास झालेले, पदवीपूर्व, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते. नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणूनही बेकारी वाढते. शिक्षण घेणारे दिवसेंदिवस वाढत असले तरी त्यांच्या शिक्षणासारखे त्यांना काम मिळत नाही. उच्च पदवी घेऊन देखील आज लाखो सुशिक्षित बेकारांचे प्रमाण वाढले आहे. सरकार कोणतेही असो पण त्या सुशिक्षितांना त्यांच्या पदवी अनुसार काम मिळाले पाहिजे, नाहीतर ही बेकारी भविष्यात खूप वाढेल व त्यांना पाहून येणारी पुढची पिढी ही शिक्षणापासून वंचित राहील असा विचार ही दिसून् येतो.
ब) तांत्रिक बेकारी
[संपादन]उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेकारी निर्माण होते त्या बेकारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते.
क) घर्षणात्मक बेकारी (संघर्षात्मक बेकारी)
[संपादन]या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार व्हावे लागते. यंत्रातील बिघाड, कच्च्या मालाची टंचाई, वीज कपात इ. मुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्वीकारेपर्यंत बेकार राहावे लागते, म्हणून त्याला घर्षणात्मक बेकारी म्हणतात. कारण या बेकारीच्या मधल्या काळात त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केलेला असतो.
३. चक्रीय बेकारी
[संपादन]'तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी म्हणतात.'
हा बेकारीचा प्रकार व्यापार चक्रामुळे निर्माण होतो. मंदीच्या काळात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक क्रिया मंदावतात त्यामुळे उद्योगांचे मालक उत्पादन कमी करतात. परिणामी कामगारांना कामावरून कमी केले जाते. उदा. २००८ च्या मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अशाच प्रकारची चक्रीय बेकारी निर्माण झाली होती.
४. संरचनात्मक बेकारी
[संपादन]जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा ही बेकारी निर्माण होते. जेव्हा मागासलेल्या व परंपरागत अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल होऊन ती आधुनिक व विकसित होत जाते तेव्हा मागणीमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल होतात. त्यातून संरचनात्मक बेकारी निर्माण होते. ही बेकारी एक दीर्घकालीन घटना होय. उदा. ऑटो रिक्षांमुळे शहरातील घोडागाडी कालबाह्य झाली म्हणजेच त्यांना संरचनात्मक बेकारी सहन करावी लागली.
भारतातील बेकारीची परिस्थिती (सद्यस्थिती)
[संपादन]भारतात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कामगारांना इच्छेविरुद्ध बेकार राहावे लागते, हे निर्विवाद सत्य आहे. नेमके किती लोक बेकार आहेत त्याचा अंदाज घेणे कठीण आहे. नियोजन मंडळ, जनगणनेचा अहवाल, तसेच मध्यवर्ती सांख्यिकी संस्था यांना या बाबतीत अचूक माहिती नाही. या बाबतीत काही अंदाज खालील प्रमाणे देता येतील-
शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारी श्रमशक्तीच्या टक्केवारीत
पाहणी कालावधी | ग्रामीण भाग | शहरी भाग |
---|---|---|
१९७७-७८ | ७.७ | १०.३ |
१९८३ | ७.९ | ९.५ |
१९७८-८८ | ५.३ | ९.४ |
१९९३-९४ | ५.६ | ७.४ |
१९९९-२००० | ७.२ | ७.७ |
२००४-२००५ | ८.२८ | ८.२८ |
बेकारीची कारणे
[संपादन]१. लोकसंख्या वाढीची जास्त गती
[संपादन]स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या आर्थिक विकासामुळे या अतिरिक्त श्रमशक्तीला द्वितीय व तृतीय क्षेत्रात सामावून घेता आले नाही. त्यामुळेच बेकारी वेगाने वाढत गेली.
२. शेती मशागतीचे मागास स्वरूप
[संपादन]अज्ञान व निरक्षरतेमुळे भारतातील शेतकरी शेतीमध्ये परंपरागत पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही. परिणामतः बेकारी वाढते.